Vikram Gaikwad passes away.jpg

प्रसिध्द रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांचे निधन


मुंबई : प्रसिध्द रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांचे शनिवारी सकाळी साडेआठच्या सुमारास पवई येथील हिरानंदानी रुग्णालयात निधन झाले. ते ६१ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी संध्याकाळी दादर येथील शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगी असा परिवार आहे.

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’, ‘झुबैदा’, ‘ओमकारा’, ‘मकबूल’, ‘लोकमान्य : एक युगपुरुष’ ते अगदी अलिकडच्या काळात ‘आदिपुरुष’, ‘पन्नियन सेल्वन’ सारख्या चित्रपटांसाठी रंगभूषाकार म्हणून काम पाहिलेले, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते विक्रम गायकवाड गेले काही महिने आजारी होते. करोना काळात त्यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीच्या कुरबुरी वाढत गेल्या. पाच-सहा दिवसांपूर्वी त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने पवई येथील हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

प्रसिध्द रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांचे निधन Rehmat Boutique

चेहऱ्यांचा किमयागार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विक्रम गायकवाड यांना फार लहानपणी आपल्यात असलेल्या कौशल्याचा सूर गवसला होता. पुण्यात लहानाचे मोठे झालेल्या विक्रम यांनी सातवी-आठवीत असताना रंगभूषाकार बबनराव शिंदे यांच्याबरोबर नाटकात रंगभूषेचे काम करण्यास सुरूवात केली होती. केवळ रंगांच्या जोरावर एखाद्या व्यक्तीला एका वेगळ्याच रुपात बदलून टाकण्याच्या या किमयेने ते मोहून गेले.

हेही वाचा

बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते पूर्णवेळ बबनराव शिंदे यांच्याबरोबर रंगभूषेचे काम करू लागले. पुढे एफटीआयआयमध्ये प्रसिध्द रंगभूषाकार आंजी बाबू यांना सहाय्यकाची गरज होती. विक्रम यांनी आंजी बाबूंबरोबर रंगभूषाकार म्हणून एफटीआयआयमध्ये काम करायला सुरूवात केली. चार वर्षांच्या त्या काळात राम कदम यांनी पठ्ठे बापूराव यांच्यावर केलेल्या ‘पवळा’ या चित्रपटासाठी रंगभूषा करण्याची संधी त्यांना मिळाली. एफटीआयआयची ही चार वर्ष प्रोस्थेटिक मेकअपसह रंगभूषेतील अनेक खाचाखोचा शिकवणारी ठरली, असे ते म्हणत असत.

विक्रम यांच्याकडे असलेले रंगभूषेचे अंगभूत कौशल्य आणि त्यांची कलेविषयीची समज पाहून त्यांना एफटीआयआयच्या महेश तावडे यांनी मुंबईत जाऊन चित्रपट क्षेत्रात काम करण्याविषयी सुचवले. मुंबईत कामासाठी आलेल्या विक्रम यांना प्रसिध्द दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या ‘सरदार’ चित्रपटात रंगभूषा करण्याची संधी मिळाली. या चित्रपटात त्यांनी खान अब्दुल गफार खान यांची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या कलाकाराला केलेली रंगभूषा पाहून बेनेगल स्तिमित झाले. बेनेगल यांच्या पुढच्या सगळ्या महत्त्वाच्या चित्रपटांसाठी विक्रम गायकवाड यांनीच रंगभूषाकार म्हणून काम केले. जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या चित्रपटात त्यांनी दाक्षिणात्य अभिनेता मामूटी यांना आंबेडकरांच्या रुपात आणण्याची केलेली किमया प्रेक्षकांनाही भावली. हा चित्रपट त्यांच्या कारकिर्दीलाही वळण देणारा ठरला.

हेही वाचा

‘मी कलाकारांचे चेहरे वाचतो. रंगभूषा करण्यासाठी कलाकार जेव्हा खुर्चीत बसतो तेव्हाच त्याच्या मनात काय सुरू आहे हे मला कळते’ असे सांंगणाऱ्या विक्रम यांनी कधीही रंगभूषेचे कोणत्याही संस्थेतून प्रशिक्षण घेतले नव्हते. ‘माणसांचे चेहरे वाचणे, त्यांचे निरीक्षण करणे या गोष्टी माझ्यात अंगभूत होत्या. रंगभूषाकार बबनराव शिंदे यांच्याबरोबर काम करत असताना त्यांनी एका गावात पाठवले होते. तिथे विविध रंगांच्या-ढंगांच्या माणसांचे निरीक्षण करत असताना त्यांच्या त्वचेचा रंग, पोत, प्रकार या सगळ्याचा अभ्यास करत गेलो, अशी आठवण त्यांनी सांगितली होती.

मनातल्या मनात सामान्यांपासून मोठमोठया व्यक्तींचे रेखाचित्र तयार करणाऱ्या विक्रम गायकवाड यांचा रंगभूषेबद्दलचा हा गाढा अभ्यासच त्यांना रंगभूषाकार म्हणून हिंदी – मराठी चित्रपटसृष्टीत नावलौकिक मिळवून देणारा ठरला. त्यांनी पुण्यात गरीब मुला-मुलींनाही रंगभूषेचे प्रशिक्षण घेता यावे म्हणून प्रशिक्षण संस्था सुरू केली. अतिशय विनम्र स्वभावाचा, रंगभूषेच्या कलेतील एकमेवाद्वितीय असा हा किमयागार हरपल्याने चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त होते आहे.

Shopping Cart
Scroll to Top